Showing posts with label Marathi Recipes. Show all posts
Showing posts with label Marathi Recipes. Show all posts

Saturday, July 18, 2020

​​अंडा घोटाला - मराठी रेसिपी


How to Make anda ghotala


​​अंडा घोटाला - मराठी रेसिपी 


साहित्य : (प्रमाण दोन जणांना पुरेल इतकं आहे)

  • ६ अंडी,
  • १ मोठा कांदा बारीक चिरून,
  • १/२ चमचा आलं लसूण पेस्ट,
  • २ मोठे टोमॅटो बारीक चिरून,
  • १-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून,
  • १/४ चमचा हळद,
  • १/२ चमचा तिखट,
  • १/२ चमचा धने पूड,
  • १ चमचा जिरे पूड,
  • १/२ चमचा पावभाजी मसाला,
  • मीठ चवीनुसार,
  • कोथिंबीर भरपूर प्रमाणात
  • आणि २-३ चमचे तेल.


कृती :

१) सहा अंड्यांपैकी १ अंडं उकडून घ्यावे.


२) एका पसरट फ्राय पॅनमध्ये तेल तापवून त्यात कांदा नीट परतून घ्या. त्यात आलं लसूण पेस्ट घालून छान मिक्स करा आणि गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्या.


३) बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घाला आणि नीट मिक्स करा आणि त्यात हळद, तिखट, धने जिरे पूड आणि पावभाजी मसाला घालून नीट मिक्स करून घ्या. १ ग्लास पाणी घालून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवा. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता त्यात उकडलेलं अंडं किसून घाला आणि नीट मिक्स करून घ्या, आता त्यात चवीनुसार मीठ घाला.


४) एका वाटीत ३ अंडी फोडून ती फेटुन घ्या आणि पॅनमध्ये घालून लगेच हलवा आपल्याला scrambled eggs टाईप consistency हवी आहे. मसाला नीट मिक्स होऊ द्या. आपल्याला एकदम कोरडी नाही आणि एकदम पातळ नाही अशी consistency हवी आहे.


५) आता पॅनमध्ये मसाला थोडा साइडला करून दोन गोल करून घ्या यात आपल्याला जी दोन अंडी उरली आहेत ती घालायची आहेत फोडून आपण हाफ फ्राय कसं करतो त्याप्रमाणे.


६) एक एक करून दोन्ही अंडी त्या केलेल्या गोलात टाकावी आणि त्यावर थोडं मीठ आणि तिखट भुरभुरावे.


७) झाकण ठेवून एक पाच मिनिटे वाफ आणावी आणि भरपूर कोथिंबीर घालून मस्त चमचमीत असा अंडा घोटाळा सर्व्ह करावा.


​​egg recipes in marathi | Prepare egg ghotala street food

Friday, July 17, 2020

​​सोलकढी - मराठी रेसिपी


​​सोलकढी - मस्त गुलाबी, थंडगार मराठी रेसिपी 



solkadhi with coconut milk powder goan style


प्रत्येक प्रांतात त्या त्या ठिकाणी पिकणाऱ्या, उगवणाऱ्या गोष्टींपासून किती निरनिराळे पदार्थ बनवले जातात नाही?


खूप कुतूहल वाटतं आणि माणसाच्या कल्पनाशक्तीचा विचार अशा वेळी मनात आल्याशिवाय राहत नाही. आपल्या देशावर तसा रोजच्या जेवणात नारळाचा वापर कमीच, शेंगदाण्याचा भरपूर! पण कोकणात मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती !


 नारळ, तांदूळ, कोकम, आंबे, फणस, काजू या आसपास मिळणाऱ्या गोष्टींचा वापर करून नवनवे पदार्थ बनवले जात असतील अगदी पूर्वीपासून!


सोलकढी त्यापैकीच एक टेस्टी पदार्थ ! उन्हाळ्यात तर विशेष थंडावा देणारा ! कोकम सरबत आपण नेहमीच पितो! आमसुलं ओली असताना त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून ठेवले जातात. 


साखर, जिरेपूड घालून सरबत बनवण्यासाठी रेडिमिक्स केलं जातं, काही आमसुलं वाळवून आमटीत टाकण्यासाठी विकायला पाकिटं बनवली जातात, तसंच आगळं म्हणजे कोकमचं घट्ट सत्व किंवा सार म्हणा ना, तेही बनवलं जातं. चिंचेचा कोळ काढतो तसा हा आमसुलाचा कोळच! 


कोकमाची ताजी फळं चिरुन गर आणि साली आधी वेगळ्या केल्या जातात आणि मग मीठ मिसळून त्यापासून हा घट्ट कोळ काढून घेतला जातो. हे आगळ घरात असेल तर सोलकढी पट्कन करता येते.


दोन नारळ तातडीने फोडून, ओलं खोबरं काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. त्यात एक दीड तांब्या चांगलं कडकडीत पाणी घालून सगळं हातानं कुस्करून नारळाचं दाट दूध, पांढरंशुभ्र काढून गाळून घेतलं! त्या नारळाच्या चवाचा पार चोथा होईपर्यंत त्यात पाणी घालून सगळं सत्व काढून घेतलं.


आपल्याला कढी जशी घट्ट, पातळ आवडते तशी नारळाच्या दुधाची कनसिस्टंसी ठेवायची. त्यात बेताचं आंबट होईल इतकं आगळ घालायचं, अहाहा, बेबी पिंक कलर लगेच यायला लागतो. मग चवीप्रमाणे मीठ, साखर, जिरेपूड आणि कोथिंबीर घालायची ! 


बरेच जण यात मिरची आणि लसूण ठेचून घालतात पण आम्हाला लसणाची कच्ची चव यात आवडत नाही म्हणून मी फक्त दोन तीन हिरव्या मिरच्या जराश्या ठेचून टाकते आणि हवा तेवढा तिखटपणा उतरला की काढून टाकते.


पुष्कळ जण यात वरुन तूप जिऱ्याची फोडणी देतात, काहीजण तर चक्क ही कढी उकळतात देखील पण त्यामुळे चव तर बदलतेच पण बरेचदा नारळाचं दूध फाटतं ! त्यामुळे ही बिन फोडणीची गार सोलकढीच प्यावी मस्त !


सगळं एकजीव करुन तासभर सगळी चव छान मुरेपर्यंत फ्रिजमध्ये गार करत ठेवावी. मग सुंदरशा ट्रांस्परंट ग्लासमध्ये ओतून दुपारी उन्हाच्या वेळी एक एक घोट सावकाश चव घेत घेत ही सोलकढी प्यावी ! 


आत्मा अगदी थंड होतो ! उन्हाच्या झळा, गरमी, घाम या सगळ्याचा काही वेळ तरी नक्कीच विसर पडतो ही खात्री !


health benefits of sol kadhi | prepare instant konkani recipe in marathi

Thursday, July 16, 2020

​​सिमला मिरची बटाटा भाजी - मराठी रेसिपी


​​सिमला मिरची बटाटा भाजी - मराठी रेसिपी 



simla mirchi bhaji recipe marathi


ही एक वेगळ्या प्रकारची सिमला मिरचीची सुकी भाजी आहे. याचा वेगळेपणा भाजी चिरण्यापासूनच दिसून येतो.यात सिमला मिरची आणि बटाटे लांब पातळ तुकडे करून घालतात  

जसे आपण फ्रेंच फ्राईज बनवताना करतो.आणि यात फक्त गरम मसाला, चाट मसाला आणि लाल तिखट घातलं जातं. आणि ही भाजी फार शिजवत नाहीत.

सिमला मिरची, बटाट्याचे तुकडे व्यवस्थित दिसले पाहिजेत. कांदा लसूण न घालताही ही भाजी खूप टेस्टी बनते. नेहमीच्या सिमला मिरचीच्या भाजी ऐवजी ही वेगळी भाजी नक्की करून बघा.


साहित्य (३ जणांसाठी):

  1. सिमला मिरची २ मध्यम
  2. बटाटे ३ मध्यम
  3. लाल तिखट अर्धा चमचा
  4. गरम मसाला अर्धा चमचा
  5. चाट मसाला अर्धा चमचा
  6. चिरलेली कोथिंबीर १ चमचा
  7. साखर अर्धा चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. फोडणीसाठी
  10. तेल १ चमचा
  11. जिरं पाव चमचा
  12. हळद पाव चमचा
  13. हिंग चिमूटभर


कृती:

१. सिमला मिरची धुवून दोन भाग करून बिया आणि पांढरा भाग काढून टाका. मिरचीचे लांब पातळ तुकडे करा– फ्रेंच फ्राईज सारखे.


२. बटाटे सोलून लांब पातळ तुकडे करा – फ्रेंच फ्राईज सारखे.


३. एका कढईत तेल गरम करून जिरं आणि हिंग घालून फोडणी करा.


४. त्यात बटाट्याचे तुकडे घाला, हळद घाला. मिक्स करून झाकण ठेवून २–३ मिनिटं शिजवा. पाणी घालू नका. मध्ये एकदा भाजी ढवळून घ्या.


५. आता कढईत सिमला मिरचीचे तुकडे घाला. मिक्स करून झाकण ठेवून २ मिनिटं शिजवा. सिमला मिरची आणि बटाटे जरा नरम झाले की पुरे. ही भाजी जास्त शिजवत नाहीत.


६. कढईत गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, मीठ,साखर घालून मिक्स करा. १ मिनिट झाकण न ठेवता शिजवा.


७. चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. सिमला मिरची बटाट्याची चविष्ट भाजी तयार आहे.


८. गरमागरम भाजी पोळी / भाकरी बरोबर खायला द्या.
​​

how to prepare aloo shimla mirch | shimla mirch recipe in marathi written

Wednesday, July 15, 2020

थालीपीठ भाजणीची उकळपेंडी - मराठी रेसिपी


थालीपीठ भाजणीची उकळपेंडी - मराठी रेसिपी :



thalipeeth recipe marathi



लागणारा वेळ: २० मिनिटे


लागणारे जिन्नस:


१. एक वाटी थालीपीठ भाजणी​​
२. दीड वाटी ताक
३. दोन मोठे चमचे तेल
४. अर्धा चमचा प्रत्येकी मोहरी व जीरे
५. पाव चमचा हिंग
६. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
७. आठ-दहा कढीपत्त्याची पाने
८. एक चमचा लाल तिखट
९. पाव चमचा हळद
१०. चवीप्रमाणे मीठ
११. मूठभर कोथिंबीर
१२. चिमूटभर साखर (ऐच्छिक)


कृती:


१. सुरुवातीला मंद आचेवर कढईत ५-७ मिनिटे एक वाटी थालीपीठ भाजणी कोरडीच खमंग भाजून बाजूला काढून घ्या.


२. आता कढईत दोन मोठे चमचे तेल घालून गरम झाल्यावर नेहमीप्रमाणे मोहरी, जीरे, हिंग व कढीपत्त्याची फोडणी करा.


३. फोडणीत बारीक चिरलेला कांदा घालून त्याला गुलाबी होईस्तर परता.


४. कांदा मऊ झाल्यावर १ चमचा तिखट, पाव चमचा हळद व चवीप्रमाणे मीठ घालून एक वेळा नीट ढवळून घ्या (चिमूटभर साखर ऐच्छिक).


५. आता थालीपीठ भाजणी घालून, २-३ मिनिटे परतून घ्या आणि दीड वाटी ताक घालून चांगली दणदणीत वाफ काढा.


६. खायला देताना वरून कोथिंबीर भुरभुरा.


वाढणी/प्रमाण:

२ व्यक्तींसाठी (एक वाटी थालीपीठ भाजणीची दोन ते अडीच वाट्या उकळपेंडी होते)


अधिक टिपा:

१. थालीपीठ भाजणीत गहू, ज्वारी, बाजरी, चणा व उडीद डाळ असल्याने, पूर्णान्न होत. आणखी पौष्टिक करायला मेथीची मुठभर पानेही घालू शकता.


२. घरी एकटे आहात, चपाती/थालीपीठ बनवायचा कंटाळा आला असल्यास पोटभरीचा उत्तम पर्याय आहे. ब्रंचसाठीही उत्तम पर्याय आहे.


३. थालीपीठ भाजणी कोरडीच व खमंग भाजण्यावरच उकळपेंडीचा स्वाद अवलंबून आहे (त्यासाठी आच मंदच ठेवावी, जळता कामा नये).


४. आधी थालीपीठ भाजणी कोरडीच भाजायची असल्याने फोडणीत जरा जास्तच तेल लागते (शिवाय विदर्भातील हवामान कोरडे असल्याने तेल जास्तच वापरले जाते)


५. मी उकळपेंडी शिजवायला ताक वापरले आहे, त्यामुळे किंचित आंबटपणा येतो. मात्र पूर्व विदर्भात गव्ह्याच्या/ज्वारीच्या पीठाची उकळपेंडी केली जाते आणि ती शिजवायला गरम पाणी वापरतात.


६. उकलपेंडी मऊसर व्हायला, एक वाटी थालीपीठ भाजणीला दीड वाटी ताक पुरेसे आहे. मोकळी आवडत असल्यास १ वाटी ताक घालावे.


७. लाल तिखटाने खमंगपणा येतो, तसा हिरव्या मिरचीने येत नाही.



bhajani thalipeeth nutrition | thalipeeth recipe in marathi

Tuesday, July 14, 2020

ज्वारीच्या पिठाचा ढोकला - recipe in marathi

​

ज्वारीच्या पिठाचा ढोकला अगदी काही क्षणातच :


आपण बहुतेकदा ढोकळ्यासाठी बेसन किंवा रवा यांचा जास्त वापर करतो. एक ग्रामीण भाग सोडला तर ज्वारीचा वापर आपल्याकडे तसा कमीच होतो. तेव्हा ज्वारीच्या पिठापासून बनवलेला ढोकळा जरुर करुन पाहावा.


साहित्य


  • एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ,
  • अर्धा वाटी दही,
  • आलं-मिरचीची पेस्ट,
  • मीठ,
  • हवी असल्यास चिमूटभर साखर,
  • मोहोरी,
  • तीळ,
  • कोथिंबीर,
  • एक चमचा फ्रूट सॉल्ट

कृती-

  • प्रथम एका पसरट भांड्यात ज्वारीचं पीठ, दही, आलं- मिरची पेस्ट आणि मीठ आवश्यकतेनुसार पाणी घालून एकत्र कालवा.
  • पीठ खूप घट्ट वा खूप पातळ कालवू नये.
  • साधारण दहा-पंधरा मिनिटं ते भिजू द्या.
  • एका बाजूला स्टिमर किंवा कुकरमध्ये तळाला पाणी घालून गॅसवर ठेवा.
  • आता या भिजलेल्या पिठात फ्रूट सॉल्ट घालून ते हलकंच हलवून ढोकळ्याच्या ताटलीला तेल लावून त्यावर ओता.
  • यानंतर स्टिमरमध्ये साधारण बारा ते पंधरा मिनिटं वाफवा.
  • हा ढोकळा जरा थंड झाल्यावर त्यावर मोहोरी आणि तीळाची फोडणी घाला, नंतर त्यावर कोथिंबीर भुरभुरा आणि सर्व्ह करा.
  • आवडत असल्यास ओलं खोबरं घालायला हरकत नाही.

टीपा:

  • याप्रमाणे नाचणीच्या पिठाचाही ढोकळा करता येतो.
  • ढोकळा किंचित रवाळ हवा असल्यास या पिठात एक ते दोन चमचे रवा घाला.


jwarichya pithacha dhokla recipe in marathi 

Monday, July 13, 2020

नानखटाई - मैद्याची - मराठी रेसिपी

​​

नानखटाई - मैद्याची  मराठी रेसिपी 



साहित्य:

  1. 12 टेस्पून तूप
  2. १/२ कप साखर (सुपरफाईन)
  3. सव्वा कप मैदा
  4. २ टिस्पून बेसन पिठ
  5. १/४ टिस्पून बेकिंग पावडर
  6. 2 टिस्पून रवा
  7. vanilla essense 2 drops


कृती:

  1. मैदा, बेसन पिठ, बेकिंग पावडर आणि रवा हे सर्व एकत्र करून चाळून घ्यावे ज्यामुळे सर्व जिन्नस एकसारखे मिक्स होतील.
  2. मऊसर तूप आणि साखर एकत्र करून हॅण्डमिक्सरने फेसून घ्यावे. हे मिश्रण अगदी हलके झाले पाहिजे. साधारण ८ ते १० मिनीटे फेसावे.
  3. फेसलेल्या मिश्रणात हळूहळू चाळलेले पिठ घालून हॅण्डमिक्सरने एकत्र करून घ्यावे. मिश्रण नरमसर आणि हलके झाले त्यात vanilla essense 2 drops घालूण गोळे करूण तूप लावलेल्या प्लेटमध्ये ठेऊण प्री हिट केलेल्या कढई मध्ये ठेऊण 15/20 मिनिट बेक करावे.


नानखटाई  ओव्हन न वापरता :



साहित्य-

  1. हरभरा पीठ-थोडे जाडसर - 1 वाटी
  2. पिठी साखर- पाऊण वाटी
  3. साजूक तूप-अर्धी वाटी
  4. बेकिंग पावडर -अर्धा लहान चमचा
  5. विलायची-६
  6. पिस्ते - ६
  7. बदाम-६


कृती:

  1. विलायची पूड तयार करा.
  2. पिस्तांचे लहान तुकडे करा.
  3. बदामाचे मधून दोन भाग करा.
  4. छोटी मध्यम उष्णनेतेवर फ्राय पॅन ठेऊन त्यात तूप वितळवून घ्या.
  5. एका ताटात विलायची पूड, पिस्तांचे तुकडे, बेकिंग पावडर, हरभरा पीठ व पिठी साखर चांगली एकजीव करा. वितळलेल्या तुपातील 2 मोठे चमचे तूप वाटीत काढा.
  6. वितळतेले तूप हरभरा पिठात टाकून चांगले मळून घ्या.
  7. कणिक सारखा सैलसर गोळा तयार झाला पाहिजे.
  8. आवश्यक असल्यास अजून तूप टाका.
  9. एक जाड व समतल बुडाचे पातेले कमी उष्णनेतेवर ठेवा.
  10. त्यात अर्धा किलो मीठ किंवा 2 वाटी वाळू टाका. व त्यावर एक जाळी ठेवा.
  11. Pressure कुकर मधील जाळी/इडली करायची सुद्धा चालेल.
  12. त्यावर ताट ठेऊन झाकून ठेवा. पातेले 10-12 मिनिट गरम होऊ द्या.
  13. तो पर्यंत एका खोलगट ताटली मध्ये सर्वदूर तूप लावून त्यात गोळे ठेवा.
  14. गोळे फुलतात त्या अंदाजाने कमीत कमी गोळे ठेवा.
  15. गोळ्यांवर बदाम किंचित दाबून लावा.
  16. आता ताटली प्री हिट केलेल्या पातेल्यात ठेवा.
  17. 15 मिनिटांनी गोळे फुलून त्याचा वरून फिकट लालसर रंग व खाली ब्राउन रंग आला असेल तर गॅस बंद करून गोळे असलेली ताटली पातेल्यातून बाहेर काढा व थंड होऊ द्या.
  18. जर खालून ब्राऊन रंग आला नसेल तर अजून 4-5 मिनिट बेक करा.


nankhatai recipe in marathi | maida biscuit recipe

Sunday, July 12, 2020

आप्पे पात्राचा वापर करून कप केक - मराठी रेसिपी

​​​​आप्पे पात्राचा वापर करून झटपट कप केक बनवा 


त्याची माहिती पुढीलप्रमाणे :


लहान मुलांना आवडेल असा हा शाकाहारी केक आहे.


साहित्य :


1. 1 कप मैदा
2. 1/2 कप पिठी साखर
3. 1 चमचा बेकिंग पावडर
4. चिमूटभर मीठ
5. 1 चमचा व्हॅनिला एसेंस
6. 20 ग्रॅम मिल्क पावडर
7. 2 चमचे साजूक तूप
8. 1/2 कप दूध
9. 2 चमचे टूटीफृटी


कृती :


1. 1 कप मैदा चाळून घ्या. त्यासोबतच टूटीफृटी पण घाला याने टूटीफृटीला पण मैदा लागतो.

2. 1/2 कप पिठी साखर आणि 1 सपाट चमचा बेकिंग पावडर ही चाळून घ्या.

3. सर्व साहित्य एकत्र करून परत चाळून घ्या याने गाठी होत नाहीत व केक हलका होतो.

4. एका मोठ्या बाउल मध्ये सर्व साहित्य घेऊन यामधे मिल्क मेड चं 20 ग्रॅम छोटं पाकीट मिळतं ते घालावे.

5. 2 टिस्पून साजूक तूप घालावे.

6. 1/2 कप दूध थोडं थोडं घालून हे मिश्रण भिजवावं.

7. 2 ते 3 मिनीट पीठ चांगलं फेटून घ्या. डोसा प्रमाणे त्याची कंसस्टंसी ठेवावी.

8. आप्पे पात्र मंद आचेवर प्रीहीट करून घ्या. मैद्यात घोळवलेले टूटीफृटी यात घाला त्यामुळे ते एकसारखे पसरतात आणि केक च्या तळाशी बसत नाहीत.

9. आवडीप्रमाणे व्हॅनिला एसेंस घाला.

10. आप्पे पात्रात थोडे थोडे तूप घाला व चमचाने केक चे बॅटर सोडावे. आधी कडेचे साचे भरावे मग मधले साचे भरावे त्याने मधले केक लवकर लाल होत नाहीत.

11. केक फुगतो त्यामुळे साचा अगदी काठोकाठ न भरता अर्धाच भरावा.
गॅस अगदी मंद आचेवर असावा त्यासाठी गॅस ची जी सर्वात छोटी शेगडी आहे ती वापरा.

12. आप्पे पात्रावर झाकण घालायचं नाहीये. 2-3 मिनीटा नंतर केक चेक करावा. जर जास्त लाल वाटला तर अधून मधून गॅस बंद करावा. साधारण 3-4 मिनीटा नंतर केक पलटवावा. चमचाने आधी केक च्या कडा मोकळय़ा कराव्या आणि मग तो पलटवावा.

13. आता 2-3 मिनीट मंद आचेवर केक ची दुसरी बाजू भाजू द्यावी आणि गॅस बंद करावा. केक छान फुगतो.

14. याला वरुन चॉकलेट चा लेयर देण्यासाठी मायक्रोवेव मध्ये चाॅकलेट बार मेल्ट करून चमचाने तो केक च्या एका बाजूवर पसरून लावावा आणि त्यावर रंगीत बॉल सोडावे याने केक अजून आकर्षक दिसतो.
तयार आहे अंडे न घालता केलेला झटपट कप केक.