Friday, July 17, 2020

​​सोलकढी - मराठी रेसिपी


​​सोलकढी - मस्त गुलाबी, थंडगार मराठी रेसिपी 



solkadhi with coconut milk powder goan style


प्रत्येक प्रांतात त्या त्या ठिकाणी पिकणाऱ्या, उगवणाऱ्या गोष्टींपासून किती निरनिराळे पदार्थ बनवले जातात नाही?


खूप कुतूहल वाटतं आणि माणसाच्या कल्पनाशक्तीचा विचार अशा वेळी मनात आल्याशिवाय राहत नाही. आपल्या देशावर तसा रोजच्या जेवणात नारळाचा वापर कमीच, शेंगदाण्याचा भरपूर! पण कोकणात मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती !


 नारळ, तांदूळ, कोकम, आंबे, फणस, काजू या आसपास मिळणाऱ्या गोष्टींचा वापर करून नवनवे पदार्थ बनवले जात असतील अगदी पूर्वीपासून!


सोलकढी त्यापैकीच एक टेस्टी पदार्थ ! उन्हाळ्यात तर विशेष थंडावा देणारा ! कोकम सरबत आपण नेहमीच पितो! आमसुलं ओली असताना त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून ठेवले जातात. 


साखर, जिरेपूड घालून सरबत बनवण्यासाठी रेडिमिक्स केलं जातं, काही आमसुलं वाळवून आमटीत टाकण्यासाठी विकायला पाकिटं बनवली जातात, तसंच आगळं म्हणजे कोकमचं घट्ट सत्व किंवा सार म्हणा ना, तेही बनवलं जातं. चिंचेचा कोळ काढतो तसा हा आमसुलाचा कोळच! 


कोकमाची ताजी फळं चिरुन गर आणि साली आधी वेगळ्या केल्या जातात आणि मग मीठ मिसळून त्यापासून हा घट्ट कोळ काढून घेतला जातो. हे आगळ घरात असेल तर सोलकढी पट्कन करता येते.


दोन नारळ तातडीने फोडून, ओलं खोबरं काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. त्यात एक दीड तांब्या चांगलं कडकडीत पाणी घालून सगळं हातानं कुस्करून नारळाचं दाट दूध, पांढरंशुभ्र काढून गाळून घेतलं! त्या नारळाच्या चवाचा पार चोथा होईपर्यंत त्यात पाणी घालून सगळं सत्व काढून घेतलं.


आपल्याला कढी जशी घट्ट, पातळ आवडते तशी नारळाच्या दुधाची कनसिस्टंसी ठेवायची. त्यात बेताचं आंबट होईल इतकं आगळ घालायचं, अहाहा, बेबी पिंक कलर लगेच यायला लागतो. मग चवीप्रमाणे मीठ, साखर, जिरेपूड आणि कोथिंबीर घालायची ! 


बरेच जण यात मिरची आणि लसूण ठेचून घालतात पण आम्हाला लसणाची कच्ची चव यात आवडत नाही म्हणून मी फक्त दोन तीन हिरव्या मिरच्या जराश्या ठेचून टाकते आणि हवा तेवढा तिखटपणा उतरला की काढून टाकते.


पुष्कळ जण यात वरुन तूप जिऱ्याची फोडणी देतात, काहीजण तर चक्क ही कढी उकळतात देखील पण त्यामुळे चव तर बदलतेच पण बरेचदा नारळाचं दूध फाटतं ! त्यामुळे ही बिन फोडणीची गार सोलकढीच प्यावी मस्त !


सगळं एकजीव करुन तासभर सगळी चव छान मुरेपर्यंत फ्रिजमध्ये गार करत ठेवावी. मग सुंदरशा ट्रांस्परंट ग्लासमध्ये ओतून दुपारी उन्हाच्या वेळी एक एक घोट सावकाश चव घेत घेत ही सोलकढी प्यावी ! 


आत्मा अगदी थंड होतो ! उन्हाच्या झळा, गरमी, घाम या सगळ्याचा काही वेळ तरी नक्कीच विसर पडतो ही खात्री !


health benefits of sol kadhi | prepare instant konkani recipe in marathi

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.