Thursday, July 16, 2020

​​सिमला मिरची बटाटा भाजी - मराठी रेसिपी


​​सिमला मिरची बटाटा भाजी - मराठी रेसिपी 



simla mirchi bhaji recipe marathi


ही एक वेगळ्या प्रकारची सिमला मिरचीची सुकी भाजी आहे. याचा वेगळेपणा भाजी चिरण्यापासूनच दिसून येतो.यात सिमला मिरची आणि बटाटे लांब पातळ तुकडे करून घालतात  

जसे आपण फ्रेंच फ्राईज बनवताना करतो.आणि यात फक्त गरम मसाला, चाट मसाला आणि लाल तिखट घातलं जातं. आणि ही भाजी फार शिजवत नाहीत.

सिमला मिरची, बटाट्याचे तुकडे व्यवस्थित दिसले पाहिजेत. कांदा लसूण न घालताही ही भाजी खूप टेस्टी बनते. नेहमीच्या सिमला मिरचीच्या भाजी ऐवजी ही वेगळी भाजी नक्की करून बघा.


साहित्य (३ जणांसाठी):

  1. सिमला मिरची २ मध्यम
  2. बटाटे ३ मध्यम
  3. लाल तिखट अर्धा चमचा
  4. गरम मसाला अर्धा चमचा
  5. चाट मसाला अर्धा चमचा
  6. चिरलेली कोथिंबीर १ चमचा
  7. साखर अर्धा चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. फोडणीसाठी
  10. तेल १ चमचा
  11. जिरं पाव चमचा
  12. हळद पाव चमचा
  13. हिंग चिमूटभर


कृती:

१. सिमला मिरची धुवून दोन भाग करून बिया आणि पांढरा भाग काढून टाका. मिरचीचे लांब पातळ तुकडे करा– फ्रेंच फ्राईज सारखे.


२. बटाटे सोलून लांब पातळ तुकडे करा – फ्रेंच फ्राईज सारखे.


३. एका कढईत तेल गरम करून जिरं आणि हिंग घालून फोडणी करा.


४. त्यात बटाट्याचे तुकडे घाला, हळद घाला. मिक्स करून झाकण ठेवून २–३ मिनिटं शिजवा. पाणी घालू नका. मध्ये एकदा भाजी ढवळून घ्या.


५. आता कढईत सिमला मिरचीचे तुकडे घाला. मिक्स करून झाकण ठेवून २ मिनिटं शिजवा. सिमला मिरची आणि बटाटे जरा नरम झाले की पुरे. ही भाजी जास्त शिजवत नाहीत.


६. कढईत गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, मीठ,साखर घालून मिक्स करा. १ मिनिट झाकण न ठेवता शिजवा.


७. चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. सिमला मिरची बटाट्याची चविष्ट भाजी तयार आहे.


८. गरमागरम भाजी पोळी / भाकरी बरोबर खायला द्या.
​​

how to prepare aloo shimla mirch | shimla mirch recipe in marathi written

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.