Wednesday, July 15, 2020

थालीपीठ भाजणीची उकळपेंडी - मराठी रेसिपी


थालीपीठ भाजणीची उकळपेंडी - मराठी रेसिपी :



thalipeeth recipe marathi



लागणारा वेळ: २० मिनिटे


लागणारे जिन्नस:


१. एक वाटी थालीपीठ भाजणी​​
२. दीड वाटी ताक
३. दोन मोठे चमचे तेल
४. अर्धा चमचा प्रत्येकी मोहरी व जीरे
५. पाव चमचा हिंग
६. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
७. आठ-दहा कढीपत्त्याची पाने
८. एक चमचा लाल तिखट
९. पाव चमचा हळद
१०. चवीप्रमाणे मीठ
११. मूठभर कोथिंबीर
१२. चिमूटभर साखर (ऐच्छिक)


कृती:


१. सुरुवातीला मंद आचेवर कढईत ५-७ मिनिटे एक वाटी थालीपीठ भाजणी कोरडीच खमंग भाजून बाजूला काढून घ्या.


२. आता कढईत दोन मोठे चमचे तेल घालून गरम झाल्यावर नेहमीप्रमाणे मोहरी, जीरे, हिंग व कढीपत्त्याची फोडणी करा.


३. फोडणीत बारीक चिरलेला कांदा घालून त्याला गुलाबी होईस्तर परता.


४. कांदा मऊ झाल्यावर १ चमचा तिखट, पाव चमचा हळद व चवीप्रमाणे मीठ घालून एक वेळा नीट ढवळून घ्या (चिमूटभर साखर ऐच्छिक).


५. आता थालीपीठ भाजणी घालून, २-३ मिनिटे परतून घ्या आणि दीड वाटी ताक घालून चांगली दणदणीत वाफ काढा.


६. खायला देताना वरून कोथिंबीर भुरभुरा.


वाढणी/प्रमाण:

२ व्यक्तींसाठी (एक वाटी थालीपीठ भाजणीची दोन ते अडीच वाट्या उकळपेंडी होते)


अधिक टिपा:

१. थालीपीठ भाजणीत गहू, ज्वारी, बाजरी, चणा व उडीद डाळ असल्याने, पूर्णान्न होत. आणखी पौष्टिक करायला मेथीची मुठभर पानेही घालू शकता.


२. घरी एकटे आहात, चपाती/थालीपीठ बनवायचा कंटाळा आला असल्यास पोटभरीचा उत्तम पर्याय आहे. ब्रंचसाठीही उत्तम पर्याय आहे.


३. थालीपीठ भाजणी कोरडीच व खमंग भाजण्यावरच उकळपेंडीचा स्वाद अवलंबून आहे (त्यासाठी आच मंदच ठेवावी, जळता कामा नये).


४. आधी थालीपीठ भाजणी कोरडीच भाजायची असल्याने फोडणीत जरा जास्तच तेल लागते (शिवाय विदर्भातील हवामान कोरडे असल्याने तेल जास्तच वापरले जाते)


५. मी उकळपेंडी शिजवायला ताक वापरले आहे, त्यामुळे किंचित आंबटपणा येतो. मात्र पूर्व विदर्भात गव्ह्याच्या/ज्वारीच्या पीठाची उकळपेंडी केली जाते आणि ती शिजवायला गरम पाणी वापरतात.


६. उकलपेंडी मऊसर व्हायला, एक वाटी थालीपीठ भाजणीला दीड वाटी ताक पुरेसे आहे. मोकळी आवडत असल्यास १ वाटी ताक घालावे.


७. लाल तिखटाने खमंगपणा येतो, तसा हिरव्या मिरचीने येत नाही.



bhajani thalipeeth nutrition | thalipeeth recipe in marathi

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.