खाकरा कसा बनवायचा :
खाकरा हा कडक फुलका, पापड रोटी या नावानेसुद्धा ओळखला जातो. चहापासून ते ब्रेकफास्टपर्यंत सगळ्या पदार्थांना साथ करणारा पदार्थ म्हणजे खाकरा. मूळचा गुजरातवरून आलेला हा पदार्थ आज घरोघरी पोचलेला आहे.
How to make different types of khakhra recipe in marathi
विशिष्ट प्रांताची खाद्यसंस्कृती संपूर्ण देशभरात किंवा जगभरात पसरणं हा आनंददायी अनुभव असतो. गुजराती खाखऱ्याला हे भाग्य लाभलंय.
आपली मराठी चकली जशी दिवाळी किंवा पाहुण्यांसाठीचा खास खाऊ अशा छापातून बाहेर पडत स्वयंपाकघरातील डब्यातून उडी मारून दुकानांमध्यल्या पाकिटांत येऊन बसलीय तसंच खाखऱ्याचंही आहे.
गुजराती मंडळींच्या आहारात खाखऱ्याचं स्थान माहात्म्य नव्याने सांगायला नको. सकाळच्या नाश्त्यात तो चहाचा सोबती होतो, पण तसा त्याला स्थळ काळ वेळ याचा मज्जाव नाही. हा पदार्थ कसा, कधी निर्माण झाला याचे दाखले नाहीत.
साधारणपणे असं म्हणता येईल की, स्वयंपाकघरातील चुकल्यामाकल्या किंवा गरजेपोटी तयार पदार्थालाच अधिक नेटकं रूप देत खाखरा जन्माला आला असावा.
गुजराती जेवण रोटली अने फुलकाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कुठल्याही घरात जेवणवेळेआधी डोकावल्यास, मुबलक तुपाची धार सोडत रोटली शेकणारी स्त्री आणि बाजूला रोटय़ांची चळत हे दृश्य सहज दिसते.
कोणा एका गुजराथी स्त्रीकडून उरलेल्या रोटी सकाळच्या नाश्त्याला शेकून खाऊ घालता घालता त्या फारच कुरकुरीत झाल्या आणि चक्क सगळ्यांना आवडून गेल्या असाव्या व त्यातूनच पुढे खाखऱ्याचा जन्म झाला असावा असा अंदाज काही मंडळी मांडताना दिसतात.
म्हणजे विशिष्ट एक पदार्थ तयार करावा या भूमिकेतून नाही तर सहज टाकाऊतून टिकाऊ निर्माण करता करता खाखरा जन्माला आला असं म्हणायला पूर्ण वाव आहे.
या खाखऱ्याने आज गुर्जर बांधवांचीच नाही तर सर्वाचीच मनं जिंकून घेतली आहेत. या पदार्थाच्या निर्मितीचे श्रेय कुणा एकीचे नाही. कुणा एकीने करून पाहिले, दुसरीने अनुकरण करत स्वत:ची भर टाकली व या साखळीतून खाखरा लोकप्रिय होत गेला. खाखरा शब्द नेमकं काय सांगतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता.
त्यात हाती लागलेला संदर्भ असा की खँखरा नामक रुंद तोंडाचा भांडय़ाचा एक प्रकारही आहे व दुसरा अर्थ होतो पातळ. खाखऱ्याची पातळ देहयष्टी पाहता त्या अर्थाने हा शब्द वापरला गेल्याची शक्यता जास्त वाटते.
पारंपरिक मेथी खाखरा, मसाला खाखरा, जिरा खाखरा यांच्यासह पावभाजी खाखरा, पाणीपुरी खाखरा, शेजवान खाखरा, डोसा खाखरा अशा आधुनिक स्वादांची दिलेली जोड जुन्याच नव्हे तर नव्या पिढीलाही खाखऱ्याशी बांधून ठेवते.
आजकाल संतुलित आहाराचं महत्त्व सांगताना डॉक्टर मंडळी सकाळच्या नाश्त्यात खाखऱ्याचा पर्याय आवर्जून सुचवतात. चहासोबत खाखरा शोभतोच पण एखाद्याला तो फार कोरडा वाटल्यास त्याला दही किंवा लोणच्याची पुरवणी दिली जाते.
एकूण काय तर कुरकुरीत, चटपटीत, झटपट व पौष्टिक असं थोडक्यात खाखऱ्याचं वर्णन करता येऊ शकतं. पापडाप्रमाणेच खाखऱ्यानेही अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून दिला आहे. मध्यतरी खाकऱ्या वरील जीएसटी करात लक्षणीय कपात केली गेली.
आज खाखरा गुजरातची सीमा ओलांडून विविध प्रांतांत घरोबा करताना दिसू लागला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल १४० प्रकारांचे खाकरे बाजारपेठेमध्ये उपलब्ध असून सर्वच प्रकारांना चांगला प्रतिसाद ग्राहक देत आहेत.
प्रवासात थोडंसं कुरुमकुरुम करण्यासाठी मोडलेला तुकडा असो वा गुजराती नाश्ता असो, भुकेला काही काळ थोपवण्याचा कुरकुरीत अनुभव खाखरा नक्की देतो.
खाकऱ्याच्या काही कृती पुढीलप्रमाणें :
मसाला खाकरा :
साहित्य:
- तीन वाट्या कणिक,
- १ चमचा तिखट,
- १/२ चमचा हळद,
- मीठ,
- आवडीप्रमाणे जिरेपूड,
- पाव चमचा ओवा,
- पाव वाटी तेल,
- एक चमचा बेसन
कृती:
- सर्व मिश्रण एकत्र करून कणिक भिजवावी तेल लावून चांगले मळावे.
- फुलक्यासाठी घेतो तेवढा गोळा घेऊन गोल पोळी लाटून तव्यावर मंद आचेवर भाजावी.
- स्वच्छ कापड घेऊन त्याने पोळीवर दाब द्यावा.
- गुलाबी रंगावर (डाग पडतील) अशी भाजावी.
- याचप्रमाणे पालक, टोमॅटो यांचा रस घालून खाकरा करता येईल.
पावभाजी खाकरा :
साहित्य:
- २ वाटय़ा गव्हाचे पीठ,
- २ चमचे मुगाचे पीठ,
- दोन मोठे चमचे पावभाजी मसाला,
- चवीपुरते मीठ
- आणि २ चमचे तेल
कृती:
- गव्हाच्या पिठात सर्व साहित्य टाकून, आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्टसर पीठ मळावे.
- तयार पीठ १५-२० मिनिटे ठेवून लिंबाच्या आकाराचे छोटे गोळे तयार करावेत.
- प्रत्येक गोळा चपातीप्रमाणे पातळसर लाटावा.
- मंद आचेवर कुरकुरीत, कडक भाजून घ्यावा.
- भाजताना कापडाने दाबत राहावे.
नाचणीचा खाकरा :
साहित्य:
- १५० ग्रॅम नाचणीचे पीठ,
- ३५० ग्रॅम गव्हाचे पीठ,
- मीठ चवी नुसार,
- तीळ ५ ग्रॅम,
- लाल तिखट १ चमचा,
- हळद १ चमचा,
- धने पावडर १/२ चमचा,
- तेल २५ ग्रॅम व ३०० मिलि पाणी
कृती:
- प्रथम नाचणीचे पीठ आणि गव्हाचे पीठ एकत्र करून घ्यावे.
- या पिठामध्ये मीठ, तीळ, लाल तिखट, हळद, धने पावडर, तेल हे सर्व मिसळून पाणी घालून मळावे.
- हा कणकेचा गोळा २०-२५ मिनिटे झाकून ठेवावा.
- २५-३० ग्रॅम वजनाचे छोटे-छोटे गोळे बनवून पातळ पोळीच्या स्वरूपात लाटून घ्यावे.
- लाटलेला खाकरा तव्यावर खरपूस शेकून घ्यावा.
How to make different types of khakhra recipe in marathi