Thursday, July 9, 2020

​​झटपट रवा ढोकळा​​ | recipes in marathi


​​झटपट रवा ढोकळा​​ बनवा अगदी काही मिनिटांत 


rava dhokla kasa banvaycha



गुजराती ढोकळा हा एक चविष्ट प्रकार आहे. ढोकळ्याचे वेगवेगळे प्रकार असतात. ही रेसिपी इन्स्टंट रवा ढोकळ्याची आहे. अगदी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. छान चविष्ट, मऊ आणि लुसलुशीत ढोकळा बनतो. फक्त या गोष्टींकडे लक्ष द्यायचे :

१. रवा फक्त ५ मिनिटं भिजवून ठेवायचा. जास्त वेळ भिजवला तर ढोकळा लुसलुशीत होणार नाही.

२. इनो घातल्यावर पीठ मिक्स करून लगेच ताटलीत घालून उकळत्या पाण्यात ताटली ठेवायची. यात वेळ गेला किंवा पाणी उकळतं नसेल तर ढोकळा दडदडीत होतो.

३. तुमच्या ढोकळा प्लेट मध्ये सगळं पीठ एका वेळी मावत नसेल तर हवं तेवढं पीठ एका बाउल मध्ये काढून त्यात इनो घालून वाफवून घ्या. ते झाल्यावर उरलेल्या पिठात इनो घालून वाफवा.


साहित्य (४ जणांसाठी):

  1. बारीक रवा १ कप
  2. आंबट ताक १ कप
  3. मिरची आलं पेस्ट अर्धा चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल १ टेबलस्पून
  6. इनो फ्रुट सॉल्ट १ चमचा


फोडणीसाठी :

  1. तेल १ टेबलस्पून
  2. मोहरी अर्धा चमचा
  3. जिरं अर्धा चमचा
  4. हिंग चिमूटभर
  5. तीळ १ टेबलस्पून ​​
  6. कढीपत्ता ८-१० पानं


कृती :

१. एका बाउल मध्ये रवा, ताक, मिरची आलं पेस्ट, मीठ आणि तेल घालून मिक्स करा. इडली च्या पिठासारखं पीठ भिजवा. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला.

२. पीठ ५ मिनिटं झाकून ठेवा.

३. इडली पात्रात / मोठ्या पातेल्यात पाणी भरून गरम करायला ठेवा. ढोकळ्याच्या ताटलीला थोडं तेल लावून घ्या.

४. इडली पात्रातलं पाणी उकळू लागलं की गॅस बारीक करा. पिठाच्या बाउल मध्ये इनो घालून, चमचाभर पाणी घाला आणि एका दिशेने फिरवून पीठ मिक्स करा. जास्त वेळ मिक्स करू नका.

५. लगेच पीठ तेल लावलेल्या ताटलीत घाला आणि ताटली हलकेच आपटून पीठ समतल करा.

६. लगेच ताटली इडली पात्रात ठेवा आणि झाकण लावून मोठ्या गॅसवर ५ मिनिटं शिजवा. नंतर गॅस मध्यम करून आणखी १५-२० मिनिटं शिजवा.

७. ढोकळा जरा गार झाला की सुरीने तुकडे करा.

८. एका लहान कढईत तेल घालून मोहरी, जिरं, हिंग, तीळ आणि कढीपत्ता घालून फोडणी करा. ही फोडणी तयार ढोकळ्यावर पसरा. तीळ फोडणीत घातल्यावर झाकण ठेवा; नाहीतर तीळ तडतडून कढईबाहेर पडतात.

९. चविष्ट, मऊ, लुसलुशीत रवा ढोकळा तयार आहे. चटणी / टोमॅटो सॉस बरोबर खायला द्या.


टीप :

१. इनो घातल्यावर लगेच पीठ वाफवायला ठेवलं पाहिजे. नाहीतर ढोकळा मऊ, लुसलुशीत होणार नाही.

२. तुमच्या ढोकळा प्लेट मध्ये सगळं पीठ एका वेळी मावत नसेल तर हवं तेवढं पीठ एका बाउल मध्ये काढून त्यात इनो घालून वाफवून घ्या. ते झाल्यावर उरलेल्या पिठात इनो घालून वाफवा.


रवा ढोकला कसा बनवायचा | Rava dhokla recipe in marathi writing

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.